Monday, February 29, 2016

सतराव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे

कधीतरी प्रकाश पाठारे ह्यांची एक कविता वपुंच्या 'आपण सारे अर्जुन' ह्या पुस्तकात वाचनात आली होती.

सत्तर वर्षांच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं, "आजी, आज इथं काय आहे?"
त्यावर तिनं उत्तर दिलं, "सतराव्या वर्षी माझ्यावर  बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे."

बत्तीस न्यायाधीश, वीस वकील, चाळीस शिरस्तेदार बदलून गेले. 
निम्मे साक्षिदार मरून, तर बाकीचे केव्हाच  पळून गेले. 
कितीतरी बलात्कारित स्त्रिया मरून गेल्या.  मी मात्र जिवंत, हीच एक कमाल  आहे. 

भगवान के घर देर है … ही म्हण अजून बदललेली नाही. 
न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी थोडीसुद्धा  सरकली नाही. 
मोर्चे, आंदोलने तेव्हाही झाली, नंतर कुणी फिरकलं नाही,
तरीसुद्धा वाटतं, आज जीवनाची सकाळ आहे.
सतराव्या वर्षी माझ्यावर  बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे.

थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी चार भिंतींच्या आत नेलं .
निकाल ऐकून मात्र तिचे पाय लटपटू लागले. पुराव्याअभावी काही आरोपी निर्दोष सुटून  गेले.
ज्यांना शिक्षा झाली , ते  तर कधीच मरून गेले.
सत्तर वर्षांच्या आयुष्याचा आज सारा निकाल आहे .
सतराव्या वर्षी झालेल्या  बलात्कारावर हा न्यायालयाचा अजून एक बलात्कार आहे..