Saturday, April 18, 2020

वाघिणीची काय चूक होती ?

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या  टिपेश्वरच्या वन्यजीव अभयारण्याच्या जंगलातील एक वाघीण जखमी झाली होती. फोटो मागवून घेतले तर मन सुन्न झाले. हरीण वर्गीय प्राण्यांना पकडण्यासाठी लावलेला फास वाघिणीच्या गळ्याला सला आणि त्यामुळे ती जखमी झाली होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास ही बातमी कळाली तसे लगेच तयारीला लागलो. वाघिणीला बेशुद्ध करायचे औषध, इतर उपकरणे जमवून आणि सगळे सामान घेतल्याची खातरजमा करून घेतली .

सगळे सामान तयार करून नागपूरहून टिपेश्वरला जाण्यासाठी निघायला रात्रीचे  नऊ  वाजलेच. प्रवासात एका ठिकाणी जाम ला थांबून जेवण करून पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला लागलो. रात्री झोपेत केव्हातरी एक दिडच्या  सुमारास टिपेश्वर जंगलात प्रवेश केला आणि झोपेतच मन आनंदून गेलं. दिवसभराच्या घडामोडींमुळे प्रचंड  थकवा  आलेला होता त्यामुळे फक्त मनातल्या मनात जंगल अनुभवत टिपेश्वरला पोहोचलो.

रात्री पोहोचून लगेच ज्या भागात वाघीण सापडली त्या भागात पोहोचून पिंजरा लावण्याची व्यवस्था केली. तिथले वन परिक्षेत्र अधिकारी  ह्यांनी वन मजूर बोलावून ठेवले होते त्यामुळे पिंजरा लावायला मदत झाली. वाघ शक्यतो प्रलोभन पिंजऱ्यात येत नाही तरीदेखील प्रयत्न करायचे ठरले. सकाळी चार वाजे पर्यंत प्रलोभन पिंजरा लावणे आणि पुढची व्यवस्था करणे ह्यात वेळ गेला. सकाळी लवकर कामाला सुरुवात करायची असल्याने लगेच झोपायला गेलो तरीपण दुसऱ्या दिवसाची तयारी करून झोपायला साडे चार वाजले.

दोन तासाची झोप घेऊन सकाळी ६.३० वाजता उठून लगेच  पिंजरा लावला होता त्या नाल्यात उतरलो. सोबतीला गस्तीचे वनमजूर, वनरक्षक आणि माझे सोबती वनपरिक्षेत्र अधिकारी होतेच. कॅमेरामधले फोटो तपासले तर त्यात वाघिणीचे फोटो आलेले नव्हते. थोडक्यात वाघीण ह्या परिसरात आलेलीच नव्हती. जखमी वाघिणीला बेशुद्ध करून पकडायचे असेल तर ती बंदुकीच्या रेंजमध्ये येणे आवश्यक होते आणि इथे तर वाघीण दिसतही नव्हती आणि जवळपासच्या परिसरात फिरकत देखील नव्हती. काम कठीण होत जाणार होते ह्याची कल्पना असल्यामुळे मी अगदी जय्यत तयारी ठेवली होती आणि महिन्याभराच्या मुक्कामाच्या तयारीने सामान आणले होते



क्रमशः




No comments:

Post a Comment